दिव्य जनलोक – शरद रसाळ
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत तांत्रीक गोष्टींमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे. या निवडणूकीत सर्वच शंकास्पद असल्याने बाबा आढाव यांना वयाच्या ९५ व्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावे लागल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मोठया परिवर्तनावर शंका घेत बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले. खा. नीलेश लंके यांनी शनिवारी सायंकाळी बाबा आढाव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
खा. लंके म्हणाले,अनेक मतदारसंघांमध्ये झालेले मतदान आणि ईव्हिएम मशिनवर आलेले मतदान यात तफावत आढळून आलेली आहे. ज्या गावांमध्ये विरोधकांचे बुधही नव्हते, त्यांचा मतदान प्रतिनिधी नव्हता, तिथेही विरोधकांना मताधिक्य मिळाले आहे. या सर्व गोष्टी शंकास्पद गोष्टी आहेत. यामुळेच ९५ वर्षांचे असतानाही बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश केला. याच कारणामुळे अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे खा. लंके म्हणाले.
खा. लंके पुढे म्हणाले, बाबा आढाव यांच्यासोबत काही तज्ञ लोक आहेत. त्यांनी तर अतिशय धक्कादायक माहिती दिली आहे. मतदानासाठी ईव्हिएम मशिन तयार करणाऱ्या कंपनीच्या तीन संचालकांमध्ये भाजपाचे गुजरात, बिहारचे माजी पदाधिकारी आहेत.अशा अनेक गोष्टी समाजापुढे येत असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
निवडणूकीमधील ईव्हिएम घोटाळयासंदर्भात बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी त्यांची सायंकाळी पुण्यात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.(छाया – शरद रसाळ, पारनेर)
हक्काच्या गावांत ५०,१०० मतांची आघाडी
आमच्या मतदारसंघात अशी काही गावे होती तिथे आमच्या उमेदवाराना एक हजार, दिड हजार मतांचे लिड मिळणे अपेक्षित होते. तिथे प्रत्यक्षात ५०,१०० मतांची आघाडी मिळाली. आजही लोकांचा कौल घेतला तर आम्ही विरोधकाला मतदान केलेच नाही असे ते सांगत आहेत.
- नीलेश लंके
खासदार, लोकसभा
नगर जिल्हयातही संशयास्पद
आमच्या मतदारसंघाच्या बाजूला बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ आहे. तिथेही अशीच स्थिती आहे. शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातही शंकास्पद निकाल आहेत. राहुरी हे प्राजक्त तनपुरे यांचे होमग्राउंड आहे, तिथेही त्यांना मताधिक्य मिळाले नाही. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. कराडमध्ये बाळासाहेब पाटलांचाही अशा तांत्रीक गोष्टींमुळे पराभव झाला असल्याचे लंके यांनी सांगितले.