भोयरे गांगर्डा कडूसमध्ये विजेचा खेळखंडोबा, शेतीपंपाला विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला

दिव्य जनलोक – शरद रसाळ


पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा व कडूस येथील शेतीपंपासह घरगुती विजेचा खेळखंडोबा होत असल्याने शेतकरी पुर्णतः मेटाकुटीला आला आहे. ऐन दिपावलीच्या काळात महावितरण कडून यात सुधारणा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सुपा सबस्टेशन अंतर्गत भोयरे गांगर्डा व कडूस येथील शेतीपंपासह घरगुती विजेचा पुरवठा केला जातो. दिवसपाळी आठ तास व रात्रपाळी आठ तास असा हा वीज होतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
विद्यूत पुरवठा सुरळीत करावा याबाबत गेली दहा दिवसांपुर्वी भोयरे गांगर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरण अभियंत्यास निवेदन देण्यात आले होते मात्र त्यात सुधारणा झाली नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.


चालू वर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे परिसरात ७०% शेती आजही पाण्याखाली आहे.३० % शेतकऱ्यांनी शेतात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू हरभरा, कांदा, मका, कडवळ, घास आदींची पेरणी व लागवड केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पिके सुकू लागली आहेत. त्या पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे असताना दिवसा तर सोडा रात्र रात्र जागून देखील पिकाला पाणी देता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. विविध पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. मात्र प्रत्यक्षात २४ तासातले १२ तास सोडा फक्त ८ तासच वीजपुरवठा द्या पण तो पूर्ण क्षमतेने द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा कुठलीही पुर्वसुचना न देता महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

चौकट ओळ – महावितरणचे सुपा सबस्टेशनचा कारभार वाऱ्यावर !

कनिष्ठ अभियंता राकेश महाजन यास पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत आज तागायत सुपा सबस्टेशनला अभियंता हजर न झाल्याने सुपा परिसरात विजेचा खेळखंडोबा होत आहे.दिवसपाळीत विज पुरवठा खंडित होत असताना आता रात्रपाळीत या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून देखील पिकाला पाणी देता येते नाही. महावितरण चा कारभार सध्यातरी वाऱ्यावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!