जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार
प्रतिनिधी | पारनेर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या लोक आंदोलन न्यासाच्या,’जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार’ या संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी मतदार जागृती अभियानाची सुरुवात पारनेर येथून करण्यात आली.न्यासाच्या कार्याध्यक्षा कल्पना इनामदार,पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,न्यासाचे खजिनदार दत्ता आवारी यांच्या उपस्थितीत पारनेर बसस्थानकावर प्रवाशी तसेच एसटीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदार जागृती अभियानाची माहिती पत्रके वाटण्यात आली.यावेळी वाहतूक नियंत्रक विशाल झावरे,अन्सार शेख,नाना आवारी,उमेश गायकवाड उपस्थित होते.
मतदार जागृती अभियानाविषयी माहिती देताना न्यासाच्या कार्याध्यक्षा कल्पना इनामदार म्हणाल्या की,स्वातंत्र्या नंतरच्या ७६ वर्षांमध्ये काही भ्रष्टाचारी,गुंड, व्यभिचारी,दहशतवादी, लुटारू व्यक्तींनी पैशाच्या, गुंडगिरीच्या जोरावर लोकसभा,विधानसभा या लोकशाहीच्या पवित्र मंदिरांमध्ये शिरकाव केला आहे.दिवसेंदिवस राजकारणातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. हा लोकशाहीला गंभीर धोका आहे. या बाबींचा विचार केला नाही तर लोकशाहीच धोक्याच येईल.देशात इंग्रजापेक्षाही अधिक अन्यायकारक अशी हुकूमशाही येईल.या दहशतवादाला मतदाराच आळा घालू शकतात असा विश्वास इनामदार यांनी व्यक्त केला.
सुदृढ लोकशाहीसाठी,स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात होण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे चारित्र्यशील उमेदवाराला आपले मत देणे आवश्यक आहे. विशेषतः युवाशक्ती ही या देशाची राष्ट्रशक्ती आहे. सामाजिक आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेने युवाशक्ती जागृत झाली तर समाज, राज्य, राष्ट्राचे उज्वल भविष्य दूर नाही. देशाच्या लोकसंख्येपैकी ६० टक्के असलेल्या युवकांनी ठरवले तर,समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून काम करणाऱ्या चारित्र्यवान व्यक्ती लोकसभा व विधानसभेत निवडून जातील अशी आम्हाला खात्री आहे.आणि त्यासाठी लोक आंदोलन न्यासाच्या वतीने मतदार जागृती अभियान राबवण्यात येत असल्याचे न्यासाचे खजिनदार दत्ता आवारी यांनी सांगितले.
मतदानाचा टक्का वाढणे आवश्यक
देशात होणाऱ्या विविध निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी चिंताजनक आहे.मतदानाचे सरासरी प्रमाण ५० ते ५५ टक्के आहे.त्यामुळे विविध अमिषे दाखवून अवघ्या २२ ते २५ टक्के मते मिळवून निवडून आलेले लोकप्रतिनिधी १०० टक्के जनतेवर राज्य करतात ही शोकांतिका आहे.त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणे आवश्यक असल्याचे मतदार जागृतीसाठी वाटप करण्यात येत असलेल्या पत्रकात म्हटले आहे.
लोक आंदोलन न्यासाच्या राज्यव्यापी मतदार जागृती अभियानाची सुरुवात पारनेर बसस्थानकावर करण्यात आली.