अहिल्यानगर-पुणे महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

कामरगाव येथील पुलावरील कठडा कोसळल्याने अपघाताची शक्यता

दिव्य जनलोक-दीपक करंजुले.

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथे वालुंबा नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा तुटल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तेथे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कठड्याचे काम ८ दिवसांत पूर्ण करावे; अन्यथा, महामार्गावरच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगारगावचे सरपंच तुकाराम कातोरे, लक्ष्मण श्यामराव ठोकळ, संतोष साठे, योगेश ठोकळ, यश ठोकळ, फय्याज पठाण यांनी दिला आहे.कामरगावच्या उत्तरेला वालूंबा नदीवर अहिल्यानगरहून पुण्याकडे जाताना मोठा पूल आहे. तेथे वारंवार अपघात होतात. दोन महिन्यांपूर्वी मालवाहू ट्रक संरक्षक कठडा तोडून नदीपात्रात कोसळल्याने ८० फुटांचा कठडा तुटला आहे. येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे. पुणे महामार्गावरून दररोज हजारो वाहने व प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांचे व वाहनांचे दळणवळण सुलभ व्हावे, याची जबाबदारी चेतक एंटरप्राइज या कंपनीची आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे त्यावर नियंत्रण आहे. परंतु, दोन महिने झाले तरी प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. यात निष्पाप जिवांच्या जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुलाच्या मागे तीव्र गोलाकार उतार असून, वाहन चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. तसेच पुलाच्या पाठीमागे योगेश ठोकळ यांच्या घरासमोरील शंभर फुटांचा संरक्षक कठडा तुटल्याने तेथे यापूर्वी पाच सहा वाहने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पडली आहेत. त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही.

शिरूर -सुपा दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे

शिरूर ते सुपा दरम्यानच्या महामार्ग रस्त्यावर खड्डे पडले असून ते संबंधित कंपनीने त्वरित बुजबावे अशी मागणी पाडळी रांजणगाव सेवा सोसायटी चेअरमन डी बी आण्णा करंजुले, नारायणगव्हाण सोसायटी चेअरमन काशिनाथ नवले,वाडेगव्हाण सोसायटी चेअरमन रामचंद्र शेळके,पाडळी सोसायटी व्हा चेअरमन आप्पासाहेब कळमकर,पळवे खुर्द येथील युवक नेते प्रसादभाऊ तरटे,अमोलशेठ शेळके, पाडळी ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव,यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!