वस्तीवर एकटी महिला बघून गळ्यातील सोने हिसकावले

शेतात एकटी महिला बघून महिलेच्या गळ्यातील असलेले सोन्याचे दागिने तोंड व नाक दाबून मारहाण करीत अंगावरील सोने बळजबरी काढून घेतल्याची घटना सोमवारी (दि. ७) दुपारी बाराच्या सुमारास पाथरवाला (ता. नेवासा) येथे घडली.

पाथरवाला येथे मुळा उजव्या कालव्यालगत दादासाहेब थोरे व लीलाबाई दादासाहेब थोरे हे वृद्ध कुटुंब राहते. त्यांना मुलबाळ नाही. सोमवारी (दि.७) दादासाहेब थोरे हे गावात रेशन आणण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या शेतात असलेल्या वस्तीवर त्यांची पत्नी लीलाबाई थोरे (वय ७०) या एकट्या घराच्या ओट्यावर बसलेल्या होत्या. अचानक एकजण त्या ठिकाणी येऊन लीलाबाई यांचे तोंड व नाक दाबले. त्याचबरोबर मारहाण करून कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरी काढून घेतले. कानातील दागिने काढत असताना जोराने ओढल्याने या झटापटीत लिलाबाई यांचा एक कान तुटल्याने त्या जखमी झाल्या आहेत

आदल्या दिवशीदेखील याच वस्तीवर एकजण आला व तुमच्या नवऱ्याने गॅस भरण्यासाठी पैसे सांगितले आहे, असे म्हणून वृद्ध महिला- पैसे देत असताना हातातील साडेचार हजार रुपये हिसकावून तेथून पसार झाला. या घटनेमुळे पाथरवाला परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन आलो आहोत. गावामध्ये याबाबत विचारपूस केली आहे. अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. जखमी महिला दवाखान्यात गेल्या असल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेचा तपास करण्यात येईल.

- संदीप ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक, नेवासा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!