संस्थापक अध्यक्ष श्री.जे.डी.मापारी सर व मुख्याध्यापिका सौ.शीतल मापारी यांचा सन्मान
दिव्य जनलोक-शरद रसाळ
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी यांच्या वतीने आयोजित रोटरी ज्ञान गौरव पुरस्कार सोहळा २०२४ डी.बी.एम.इंग्लिश मीडियम स्कूलला प्रतिष्ठित आदर्श विद्यालय पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने शाळेने शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान आणि उत्कृष्ट कामगिरीला मान्यता मिळाली आहे. शाळेचे संस्थापक अध्यक्ष जेडी मापारी यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
याच सोहळ्यात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीतल मापारी यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अप्रतिम योगदानासाठी विद्या विभूषण पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने ग्रामीण भागात उच्च दर्जाचे शिक्षण पुरवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या नैतिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासावर विशेष भर दिला जातो, ज्यामुळे शाळा शहरातील विद्यार्थ्यांनाही आकर्षित करते.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी हा क्लब सामाजिक कार्यात आणि शिक्षणाच्या प्रसारात अत्यंत सक्रिय आहे. गेल्या काही वर्षांत क्लबने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. हा क्लब आंतरराष्ट्रीय रोटरी इंटरनॅशनल चा एक भाग असून, जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये आपल्या सेवांचे कार्य करते. या क्लबचे उद्दिष्ट समाजातील विविध घटकांना एकत्र आणून शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये योगदान देत आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार ८ सप्टेंबर रोजी संजोग लॉन्स, नगर-मनमाड रोड, सावेडी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्य अतिथी म्हणून श्रीमती. मीनाताई माणिकराव जगधने, रयत शिक्षण संस्था, सदस्या सातारा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रमुख उपस्थितीत अशोक कडूस (शिक्षणाधिकारी माध्यमिक), भास्कर पाटील (शिक्षणाधिकारी प्राथमिक), बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी योजना), आणि दिनकर टेमकर (माजी शिक्षण स. आयुक्त, पुणे ) हे मान्यवर सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान, गुणवंत शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्या विभूषण पुरस्कार अंतर्गत शाळेतील शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक करण्यात आले. शाळेने मिळविलेल्या या यशामुळे संस्थेची आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्राची प्रतिष्ठा वाढली आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनामागे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीचे अध्यक्ष राजीव चितगोपिकर, सचिव निखिल कुलकर्णी, आणि साहित्य संचालक दिनकर टेमकर यांचे विशेष योगदान आहे. क्लबचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबवून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
पुरस्कार सोहळ्यानंतर, उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे आणि शैक्षणिक दर्जाचे कौतुक केले. हा पुरस्कार शाळेच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, आणि पालकांचे प्रोत्साहन ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
– राळेगणसिद्धी ता.पारनेर येथील डी.बी.एम इंग्लिश मीडियम स्कूलला आदर्श विद्यालय पुरस्कार देऊन संस्थापक अध्यक्ष श्री.जे.डी.मापारी सर व मुख्याध्यापिका सौ.शीतल मापारी यांचा सन्मान करतांना मान्यवर.(छाया – शरद रसाळ, पारनेर)